मनाच्या अंतरंगाचा वेध घेणारे शास्त्र
(डॉ. जयश्री महाजन)
मनाच्या आत काय दडले आहे, हे समजणे अतिशय अवघड आहे, त्याहून अवघड आहे, मनातल्या
खळबळीमुळे आपल्या आयुष्यावर होणारे परिणाम काय होतील हे सांगणे. ....... साहिल
एकदा दवाखान्यात आला. तापाने फणफणलेला, चेहरा लाल झालेला, डोळ्यांवर गुंगी. "नेहमी
मस्ती करणारा, बडबड करणारा साहिल आज एवढा गप्प?' मला पडलेला प्रश्न. ""काय
झालं?'' मी त्याच्या आईला विचारले, ""काही विशेष नाही, काल मी घर आवरत होते आणि हा
खेळत होता. अचानक ओरडायला व रडायला लागला, मी विचारले "काय झाले?' तर त्याने कोळी
पाहिला आणि घाबरला, मी त्याला शांत केले, पण थोड्या वेळात ताप चढायला लागला.
भीतीने असे होऊ शकते, डॉक्टर?''
""हो असे होऊ शकते.''
आपल्या घरात, आजूबाजूला मित्र-मैत्रिणींमध्ये, आपण नेहमी पाहतो, की अशा काही
व्यक्ती असतात, त्यांच्या मनात कुठेतरी, कशाची तरी भीती असते, ते सतत कशाच्या तरी
दडपणाखाली असतात, त्या भीतीचा परिणाम त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनावर थोड्या-
अधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे त्यांना थोडी न्यूनगंडांची भावना जाणवते.
इतरांपेक्षा आपले काहीतरी वेगळे आहे, ह्याची मनाला टोचणी असते, त्याचा परिणाम
त्यांच्या नातेसंबंधावर, कर्तृत्वावर, जगण्यावर होत असतो, मग ते एक तर प्रवाहाच्या
बाजूला फेकले जातात किंवा स्वतःला बाहेर ठेवू इच्छितात.
खरंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या थोड्या औषधांनी व चर्चा करून सुटणाऱ्या असतात.
होमिओपॅथीमध्ये तर ह्या छोट्या-छोट्या मनाच्या स्थित्यंतरावर इतकी चांगली औषधे
आहेत, की कधी कधी तर आश्चर्यकारक बदल घडून येऊ शकतात.
नोकरदारवर्गामध्ये आढळणारे दडपण- सतत कामावर आपल्याला बॉस काय बोलेल? आपले काम
बरोबर होईल की नाही, पूर्ण होईल की नाही, ह्या गोष्टीची सतत भीती असणे, दुचाकी
किंवा कार चालवताना, विशेषतः गर्दीतून चालवताना भीती वाटणे, खूप माणसं समोर
पाहिली, की अंगाला कापरं सुटणे, छातीत धडधडणे, घाम फुटणे, तोंडातून शब्द न फुटणे,
आयत्या वेळी बोलायचे काय, हेच विसरून जाणे किंवा मुलाखतीच्या आधी सतत टॉयलेटला
जावेसे वाटणे, तापासारखे वाटणे किंवा आजारी पडणे, स्टेजवर बोलण्याची भीती वाटणे.
घरात किंवा ऑफिसमध्ये काही भांडणे झाली, बाचाबाची झाली, की लगेच डोके दुखायला
लागणे, झोप न येणे, सतत विचारचक्र चालू राहणे, आजूबाजूला काय चालले आहे, ह्याचे
भान न राहणे, भूक न लागणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, थोडा मोठा आवाजही सहन न होणे,
त्यामुळे चिडचिड होणे, थोड्या-थोड्या गोष्टींवरून संतापणे, संतापात वस्तू फेकून
मारणे किंवा समोरच्यावर राग काढणे, हात उगारणे किंवा मारणे, नंतर कदाचित त्याबद्दल
दुःख होईल, पण त्याक्षणी स्वतःवरचा ताबा घालवणे.
बऱ्याच जणांना एकटं राहायला आवडते, कोणाबरोबर सहसा जमत नाही, विशेषतः
स्त्रियांमध्ये थोडे कोणी टोचून बोलले, मनाविरुद्ध काही झाले, की रडू येणे व सतत
त्या विचारांमध्ये बुडून जाणे, सतत जोडीदाराचा संशय येणे, शेजारी कोणाला काही आजार
झाला तर तो आपल्यालाही होईल, अशी भीती वाटणे.
शाळेत जाणाऱ्या मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, एकाग्रता नसणे, शाळेत जायची भीती
वाटणे, स्मरणशक्ती कमी असणे, खोटे बोलायची सवय असणे. काहींना झोप शांत लागत नाही.
चित्र-विचित्र स्वप्न पडल्याने, भीतिदायक स्वप्न पडल्याने झोपेतून दचकून जागे
होणे, सतत पाण्याची, किटकांची, भुतांची, मृत माणसांची स्वप्ने पडणे, आपण खूप धावतो
आहोत व थकून घाम आला आहे, अशी स्वप्ने खरंच थकवा निर्माण करतात. त्यामुळे झोप
व्यवस्थित होत नाही व दिवसा ताजेतवाने वाटत नाही.
काहींना भीतीमुळे सतत भास होत असतात, जसे आपला कोणीतरी पाठलाग करत आहे, वेगवेगळे
आवाज ऐकू येतात, सतत कोणत्यातरी प्राण्याचा भास होणे, अंधाराची भीती वाटणे,
त्यामुळे सतत भेदरलेले भाव चेहऱ्यावर असतात. मुलींना वयात यायच्या वेळेस, पाळीच्या
वेळेस काही मानसिक बदल जाणवतात. शरीरातील झालेले बदलांची लाज वाटणे त्यामुळे
स्वतःला घरात कोंडून घेणे, लैंगिक आकर्षण प्रमाणापेक्षा जास्त वाढणे, चिडचिड
वाढणे, रडणे, हट्टीपणा वाढणे, असे बदल घडून येतात.
सतत कुढत राहण्याचा स्वभाव, कुरकूर करणे, समोरच्यावर विश्वास न ठेवणे, खोटे बोलणे
किंवा समोरचा खोटेच बोलतो असे धरून चालणे, संशय घेणे, अति दुःख किंवा अति आनंद सहन
न करता येणे, क्षणाक्षणाला विचार बदलणे, मूड बदलणे, रागात दुसऱ्याला जीवे
मारण्याची किंवा आत्महत्या करण्याचे विचार सतत डोक्यात चालणे, रागात स्वतःचे
कपडेच फाडून टाकणे, अशा विशिष्ट लक्षणांवर होमिओपॅथीच्या औषधांनी उपचार करता येऊ
शकतात, जसे ऍकोनाईटच्या रोग्याला सतत मरणाची भीती असते. एथुसाचे मूल सतत रडत असते
व कुत्र्या-मांजरांची भीती व भास होत असतात. ऍल्युमिनाच्या रोग्याला सगळ्या
गोष्टीची घाई असते, वेळ जात नाही, रक्त किंवा सुरी पाहिली, की आत्महत्या करावीशी
वाटते. ऍम्ब्राच्या रोग्याला एकटं राहायला आवडते, जगण्याचा कंटाळा आलेला असतो,
इतरांसमोर काही करू शकत नाही. ऍन्टीमोनी, क्रूडच्या बालकाला स्पर्श केलेला किंवा
त्याच्याकडे पाहिलेले पण चालत नाही. अर्निकाच्या रोग्याला कोणी स्पर्श केलेले
किंवा जवळ आलेले चालत नाही, दुखणे सहन होत नाही, सर्व शरीर अलवार वाटते. अशी
प्रत्येक औषधाची विशिष्ट लक्षणे आहेत. अशाप्रकारे छोट्या-छोट्या गोष्टींना,
होमिओपॅथीची साथ घेऊन सुधारता येते.
- डॉ. जयश्री महाजन
होमिओपॅथीतज्ज्ञ, पुणे. |